तळेरे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्ग खारेपाटणच्या तटबंदीवर तब्बल ३०० मशाली प्रज्वलित झाल्या आणि काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या इतिहासाला जणू नवसंजीवनी मिळाली! पेटत्या मशालींच्या तेजस्वी प्रकाशात उजळून निघालेला किल्ला, शिवगर्जनांनी दुमदुमलेला परिसर आणि शिवप्रेमींच्या उत्साहाने भारावलेले वातावरण… अशा ऐतिहासिक आणि रोमांचकारी सोहळ्यात कोकणचे शिलेदार संघाच्या वतीने प्रथमच भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

दुर्ग खारेपाटणचा ऐतिहासिक वारसा जतन करणे, त्याचे महत्त्व सर्वदूर पोहोचविणे आणि भावी पिढ्यांसाठी शिवकालीन इतिहासाची अमूल्य ठेव जपणे, या उदात्त हेतूने कोकणचे शिलेदार संघाने हा विशेष उपक्रम हाती घेतला. या मशाल महोत्सवाने केवळ किल्ल्याची तटबंदी प्रकाशमान केली नाही, तर शिवप्रेमींच्या मनातील इतिहासप्रेमाची ज्योतही अधिक प्रखर केली.
झाडाझुडपांत हरवलेला दुर्ग… शिवप्रेमींच्या श्रमातून पुन्हा उजळला!
खारेपाटणचा ऐतिहासिक किल्ला अनेक वर्षांपासून झाडाझुडपांच्या विळख्यात अडकून पडला होता. काळाच्या ओघात किल्ल्याच्या परिसरात वाढलेल्या जंगलामुळे पायऱ्या, पायवाटा आणि तटबंदीपर्यंत जाणारे मार्गही अस्तित्वहीन झाले होते. इतिहासाचा साक्षीदार असलेला हा दुर्ग दुर्लक्षित अवस्थेत पाहून शिवप्रेमी युवक-युवतींच्या मनात संवर्धनाची ठिणगी पडली.
कोकणचे शिलेदार संघातील दुर्गसेवक आणि दुर्गसेविकांनी किल्ल्याच्या परिसरात साफसफाई व स्वच्छता मोहिमा राबविल्या. काटेरी झुडपे, वाढलेले गवत आणि जंगलमय झालेल्या पायवाटा श्रमदानातून मोकळ्या करण्यात आल्या. दुर्गावर जाण्याचे मार्ग पुन्हा खुले करत या तरुणांनी इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचा ध्यास घेतला.
त्यांच्या अथक परिश्रमातून दुर्लक्षित दुर्गाला नव्याने ओळख मिळू लागली असून, किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व दुर्गप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मशालींच्या उजेडात शिवकालीन वैभवाचा जागर!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभारलेल्या गड-किल्ल्यांचा वारसा अभेद्य राहावा आणि खारेपाटण किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, या संकल्पनेतून ३०० मशालींचा भव्य मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला. कोकणचे शिलेदार संघ, शिव शंभू विचार मंच, ग्रामपंचायत खारेपाटण आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. हिंदवी प्रतिष्ठान, राजापूर यांनीही या शिवकार्यात सहभाग घेत सहकार्याचा हात पुढे केला. कणकवली पोलीस दलाने संपूर्ण कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवला.
कार्यक्रमाची सुरुवात खारेपाटण येथील प्रतिष्ठित नागरिक तथा मंदिर समितीचे अध्यक्ष मधुकर गुरव यांच्या हस्ते गडदेवतेच्या पूजनाने झाली. यावेळी भूषण साटम, संजय शिंदे, कोकणचे शिलेदार संघाचे प्रमुख पदाधिकारी, हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे पदाधिकारी आणि शिवरायांचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर शिव शंभू विचार मंचचे कोकण प्रांत अध्यक्ष जयदीप देसाई, भूषण साटम, मधुकर गुरव, कोकणचे शिलेदार संघातील दुर्गसेवक-सेविका, हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे अध्यक्ष महेश मयेकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. प्रत्येक पूजनावेळी घुमणाऱ्या शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला.
वीरगळ पूजनातून वीरांच्या स्मृतींना अभिवादन!
खारेपाटण किल्ल्याच्या इतिहासातील शौर्यगाथा आणि वीरांच्या बलिदानाची स्मृती जपणाऱ्या वीरगळाचे पूजन करण्यात आले. या वीरगळ पूजनातून त्या अमर वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
शिव शंभू विचार मंच, भूषण साटम, संजय शिंदे, जयदीप देसाई, विजय देसाई, ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर, संजय खानविलकर, कोकणचे शिलेदार संघाचे दुर्गसेवक आणि हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे दुर्गसेवक यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला.
इतिहासाच्या पाऊलखुणांना वंदन करत वीरांच्या स्मृती जागविणारा हा क्षण उपस्थितांसाठी भावपूर्ण ठरला.
रवळनाथ मंदिरातून प्रज्वलित झाली मुख्य मशाल; दुर्गावर मशालींचा महासागर!
दुर्गसेवकांनी मशाल फेरीचे आयोजन केले. खारेपाटण गावाचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिरात नारळ वाढवून मुख्य मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर खारेपाटण बसस्थानक येथे गारद देत मशाल दुर्ग खारेपाटणकडे रवाना झाली.
किल्ल्यावर पोहोचल्यानंतर एकामागोमाग एक मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. पाहता पाहता ३०० मशालींच्या ज्योतींनी संपूर्ण दुर्ग परिसर उजळून निघाला. काळोखाच्या कुशीत विसावलेल्या तटबंदीवर मशालींचे तेज पसरले आणि खारेपाटणच्या इतिहासाला जणू प्रकाशाचा नवा अध्याय लाभला. या सोहळ्यात कणकवली तालुक्यातील बिडवाडीच्या दुर्गसेविकांनी मर्दानी आणि धाडसी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या चित्तथरारक सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगात उत्साह संचारला.
दुर्गसेवकांचा सन्मान; साहिल गुरव यांचा विशेष गौरव
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना शाल आणि फोटो फ्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक गडकिल्ले मोहिमा पूर्ण करणारे दुर्गसेवक कु. साहिल गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. शेवटी मान्यवर, ग्रामस्थ आणि दुर्गप्रेमींचे आभार मानून या ऐतिहासिक मशाल महोत्सवाची सांगता करण्यात आली.
किल्ल्याची अस्मिता जपण्यासाठी सामूहिक सहभागाची गरज!
दुर्ग खारेपाटणच्या संवर्धनासाठी कोकणचे शिलेदार संघातील दुर्गसेवकांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा अपेक्षित उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग दिसून आला नाही, ही खंतही व्यक्त करण्यात आली.
खारेपाटणची अस्मिता असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याचे महत्त्व ओळखून स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. किल्ल्याचे संवर्धन ही केवळ एखाद्या संघटनेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. किल्ल्यांची स्वच्छता, ऐतिहासिक माहितीचे जतन, दुर्गप्रेमींसाठी सुविधा आणि नियमित संवर्धन मोहिमा यांद्वारे हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविता येईल.
३०० मशालींच्या प्रकाशात उजळलेला दुर्ग खारेपाटण हा केवळ मशाल महोत्सव नव्हता, तर इतिहास जपण्याचा, शिवविचार जागविण्याचा आणि तरुणाईच्या दुर्गसेवेचा तेजस्वी संकल्प होता. या मशालींची ज्योत आता प्रत्येकाच्या मनात पेटली पाहिजे; कारण गड-किल्ले म्हणजे केवळ दगड-मातीची बांधकामे नव्हेत, तर स्वराज्याच्या अभिमानाची, पराक्रमाची आणि अस्मितेची अमूल्य स्मारके आहेत!



