संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न! ; संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम. ; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

सावंतवाडी: वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजसेवेसाठी समर्पित करण्याचा स्तुत्य आदर्श संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे पाहायला मिळाला. दर्शन विद्या शिक्षण संस्था, ठाणे व्यवस्थापित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशालेच्या परिसरात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आणि मानवतेची खरी सेवा या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला सामाजिक बांधिलकीची सुंदर जोड लाभली. रक्तदानातून एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, तसेच त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले. प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री. मनिष सावंत सर, श्री. साईश तारी सर आणि श्रीमती राधिका पणशीकर मॅडम यांनीही रक्तदान करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर, समन्वयक श्री. अजय बांदेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सामाजिक जाणीव, माणुसकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम प्रशालेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत समाजाला जीवनदानाचा अनमोल संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

वाढदिवस साजरा करण्याचा हा सेवाभावी आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, रक्तदानातून माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा हा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय ठरला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles