पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!, ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’ म्हणणाऱ्या अधीक्षक अभियंत्याला जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस!, २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश., …अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविणार!

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या तिलारी दौऱ्याच्या पूर्वतयारीदरम्यान पत्रकारांबाबत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांना चांगलेच भोवले आहे. ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत सविस्तर लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा तो असमाधानकारक आढळल्यास शिस्तभंगाची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्याचा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात पूर्वतयारी आणि स्वच्छतेची कामे सुरू होती. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून ‘फोटो काढणाऱ्याला उचलून फेकून द्या’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे वृत्त शक्तिपथ Live आणि अन्य प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले होते.
या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २३ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केली. शासकीय सेवेत वरिष्ठ आणि जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसेच सार्वजनिक ठिकाणी कामकाज करताना शासकीय शिष्टाचार, संयम आणि सौजन्य राखणे अपेक्षित असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
पत्रकारांसमोर वापरण्यात आलेली भाषा आणि संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिशीत स्पष्ट केले आहे. या नोटिशीची प्रत पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे विशेष कार्य अधिकारी, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तसेच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला प्रशासकीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता अधीक्षक अभियंता काय खुलासा करतात आणि त्यावर जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles