संजय पिळणकर.
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांना ‘उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना श्री यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री राजे देशमुख (सी. ए. आणि समन्वयक,फ्रायडे क्लब, पुणे), श्री. पाठक (प्रशासकीय अधिकारी), प्राचार्य अतुल साळोखे, दीपा वर्मा आणि सौ. दळवी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
डॉ. एम. बी. चौगले यांनी हा सन्मान महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे नमूद केले.तसेच, “करिअर कट्टा” उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत असून, भविष्यातही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,चेअरमन मंजिरी मोरे_देसाई व पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी प्राचार्य चौगले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या पुरस्कारामुळे बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला नवी ओळख मिळाली असून,संपूर्ण शिक्षण क्षेत्रातून प्राचार्य डॉ.चौगले यांचे अभिनंदन केले जात आहे.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.