सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळ क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश मालवणकर यांनी केली आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (आर्बिटर) लेखी परीक्षेत यश संपादन करत दोघांनीही राज्यस्तरीय पंचपद मिळविले आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा मान मिळविणारे ते पहिले बुद्धिबळ पंच ठरले आहेत.
परीक्षेपूर्वी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे दोन दिवसांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसह परीक्षेत राज्यभरातील तब्बल ४५ जणांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी) आणि मयुरेश मालवणकर (मालवण) यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली.
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनने नुकताच निकाल जाहीर केला असून दोघांनाही राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच म्हणून मान्यता दिली आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश संपादन केले.
ॲकेडमीच्या सचिव सौ. स्नेहा कौस्तुभ पेडणेकर यांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



