Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

वन आणि वन्यजीव संवर्धनातील उल्लेखनीय कार्यासाठी वनाधिकारी मंगेश ताटे यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक.!

सातारा : महाराष्ट्र शासनाने वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तासगाव, जिल्हा सातारा येथील वन अधिकारी मंगेश मधुकर ताटे यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्याघ्र संरक्षण, पर्यावरण व्यवस्थापन, आणि जैवविविधता संवर्धनासाठी भरीव कार्य केले आहे. विशेषत: पेंच व्याघ्र प्रकल्पातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे व्याघ्र संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत.

मंगेश ताटे यांनी २०१६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत यश मिळवत वन परिक्षेत्र अधिकारी ( Range Forest Officer) म्हणून सेवेत प्रवेश केला. कुंडल वन अकादमीत नियुक्तीपूर्व प्रशिक्षण घेत असताना त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. सेवा सुरू झाल्यानंतर त्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या वन परिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत राहून अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. तोतलाडोह जलाशयातील अवैध मासेमारीवर त्यांनी प्रभावी नियंत्रण मिळवले आणि आवश्यकतेनुसार कठोर कारवाई देखील केली.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व वन परिक्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी व्याघ्र संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी विशेष धोरणे अमलात आणली. बदलत्या हवामानाच्या परिणामांच्या अनुषंगाने NAFCC प्रकल्पांतर्गत गाभा क्षेत्रा मधील खराब झालेल्या जंगलाचे पुनर्स्थापन केले. या कामाच्या अंतर्गत त्यांनी अनेक इमारती हटवून त्या जागी निसर्गस्नेही जंगल विकसित केले. त्यांच्या या अभिनव प्रकल्पाला SKOTCH पुरस्काराने गौरविण्यात आले.

व्याघ्रसंवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “CATS accreditation” मिळाले तसेच वाघांच्या वाढत्या संख्येसाठी “Tx2 अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. याशिवाय Management Effective Evaluation (MEE) मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाला देशात पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये स्थान मिळाले.

त्यांनी व्याघ्र पुनर्वसनासोबतच अवनी वाघिणीच्या अनाथ छाव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच त्यांनी सिल्लारी येथे निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठी, व्याघ्र अधिवास संरक्षणासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी त्यांनी अनेक प्रभावी उपाययोजना राबवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज या प्रकल्पात वाघांची संख्या ६० च्या घरात पोहोचली आहे.

त्यांच्या या कार्यात तत्कालीन क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, ए. श्रीलक्ष्मी आणि डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांचे मार्गदर्शन, तसेच सहायक वनसंरक्षक अतुल देवकर, किरण पाटील आणि गीता नन्नावरे यांचे सहकार्य मिळाले. वन विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभल्यामुळेच हे यश शक्य झाले.

मंगेश ताटे यांनी वनसंवर्धन आणि व्याघ्र व्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या अप्रतिम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगेश ताटे हे सध्या सहायक वनसंरक्षक, पुणे या पदावर आपली सेवा बजावत आहेत त्यांचा हा गौरव वन विभागातील नव्या पिढीच्या अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles