कणकवली : कणकवली बाजारपेठेतील महापुरूष कॉम्पलेक्सच्या पाठीमागे ड्रेनेज पाईप व पाण्याची टाकी असलेल्या अडगळीच्या जागेत इमारतीला टेकून बसलेल्या स्थितीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास उघडकीस आली.
महापुरूष कॉम्पलेक्समध्ये दुकान असलेले सचिन चव्हाण (५०, रा. आंबेआळी, कणकवली) यांनी आपले दुकान उघडल्यानंतर त्यांना तसेच आसपासच्या लोकांना काहीतरी कुजल्याचा वास आला, म्हणून काय कुजले याची पाहणी करत असताना सचिन चव्हाण यांना इमारतीच्या भिंतीला टेकून बसलेल्या स्थितीत अनोळखी पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डाव्या हातावर ‘एमपीआर’ असे इंग्लिश अक्षरांमध्ये गोंदलेले आहे. त्याच्या अंगावर निळ्या रंगाची फुल ट्रॅक पँट, अंगात काळ्या रंगाचा फुल हाताचा गोल गळ्याचा टिशर्ट, काहीशी दाढी वाढलेली असे त्याचे वर्णन आहे.
तरी त्याच्याबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. दोन ते तीन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर सचिन चव्हाण यांनी दिली. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.