सावंतवाडी: उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात, शाळेत विविध दाखले मिळावे यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व शाळात ‘दाखल्यांची शाळा’ हा उपक्रम ग्राम महसूल कार्यालयात राबवणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने….
शाळा,महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेणे,शिष्यवृत्तीचा लाभ मिळवणे अथवा सरकारी नोकरी साठी अर्ज दाखल करणे यासाठी जातीचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांची आवश्यकता असते.परंतु शालेय जिवनात या दाखल्या बाबत पुरेसी माहिती विद्यार्थ्यांना नसते व त्यामुळे जेव्हा शाळा,महाविद्यालय यांच्याकडून प्रवेशासाठी अथवा शिष्यवृत्तीसाठी या दाखल्यांची मागणी करण्यात येते, तेव्हा विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरु होते.त्यामध्ये प्रामुख्याने जातीचे जुने पुरावे शोधण्यापासून ते अर्ज दाखल करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे. असा सर्व सामान्य अनुभव आहे.त्यामुळे शालेय स्तरावरच दाखले नोंदणीचे शिबीर आयोजित करून दाखल्यांचे वितरण करण्यासाठी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मध्ये उन्हाळी सुट्टीत “दाखल्यांची शाळा”हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
“दाखल्यांची शाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे हेतू :-
➡️ दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची होणारी धावपळ थांबवणे.
➡️एका छताखाली सर्व दाखले उपलब्ध करून देणे.
➡️मध्यस्थ व्यक्तीकडून विद्यार्थी व पालक यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे.
➡️विद्यार्थी – पालक यांच्या श्रमाची व पैश्याची बचत करणे.
➡️लोकाभिमुख प्रशासन राबवणे व रुजवणे.
या उपक्रमातून ग्राम महसूल अधिकारी यांचे स्तरावरील उत्पन्न अहवाल तर जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गावातच विद्यार्थ्यांना दाखले वितरण करण्यात येणार आहे. व्हॉट्सऍप द्वारे डिजिटल signed दाखले देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी, पालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार श्री. श्रीधर पाटील व सर्व महा ई – सेवा केंद्र चालक यांचे मार्फत करण्यात येत आहे.