मुंबई : मुंबई विद्यापीठाने एलएलबी तृतीय वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी अर्धा तास पेपर सोडविल्यानंतर चुकीची प्रश्नपत्रिका दिली गेल्याचे विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नवी प्रश्नपत्रिका देण्यात आली.
सध्या मुंबई विद्यापीठातील एलएलबी तृतीय वर्षे (फायनल) सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवार रोजी सत्र पाच अभ्यासक्रमाच्या ‘लेबर लॉ अॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन भाग दोन’ या विषयाच्या एटीकेटी अभ्यासक्रमाची परीक्षा होती. सकाळी १०:३० वाजता पेपर होता. त्याची प्रश्नपत्रिका सकाळी ९:३० वाजता विद्यापीठाकडून कॉलेजांना पाठवण्यात आली. कॉलेजांनी परीक्षा सुरूही केली. मात्र, प्रश्नपत्रिका जुन्या अभ्यासक्रमानुसार असल्याचे काही कॉलेजांच्या लक्षात आले. त्यांनी ही चूक विद्यापीठाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाने नवी प्रश्नपत्रिका पाठविली. मात्र, तोपर्यंत अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला होता.
विद्यापीठाकडे विचारणा केली असता, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे पेपर तयार केला होता. त्यामुळे संबधित पेपरची लिंक बंद करून त्याजागी नवीन पेपर पाठविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
ADVT –