सावंतवाडी : स्वतःसह तीन मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एका चार वर्षाच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स मधील कापड दुकानात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हुसेन रजाक गडीयाली (राहणार – कोलगाव, कोकण कॉलनी) सावंतवाडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेला हुसेन गडीयाली याचे बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्याचे दुकान आहे. पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दररोजच्या प्रमाणे गडीयाली याने आपले दुकान उघडले. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली. रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करण्यासाठी दुकानाचे शटर बंद करीत असताना पत्नी हिने आपण घरी जाणार नाही. मी दुकानातच राहणार आहे. असे ठामपणे सांगत राहिली. या कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. तू दुकानातून घरी जा, राग अनावर झाल्याने तू घरी गेली नाहीस तर तुला व मुलांना मारून टाकीन व स्वतःला संपवून घेईन, अशी धमकी त्याने दिली. या प्रकाराने कॉम्प्लेक्स मधील दुकानदारांसह नागरिकांनी गर्दी केली. यावेळी हुसेन गडीयाली याने रागाच्या भरात पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. त्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन गडीयाली याला ताब्यात घेतले. त्यानंतर घाबरलेल्या चार वर्षाच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलाच्या तब्येतीत सुधारणा झाली. याप्रकरणी पत्नी मुमताज हुसेन गडीयाली (वय २७ रा. – माठेवाडा, सावंतवाडी} यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन मुलांसह स्वतः अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पती हुसेन गडीयाली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.