सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे, पेडवेवाडी येथील हनुमान मंदिरात जय हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्माेत्सव सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. सायं. ७ वाजल्यापासून स्थानिक पेडवेवाडीतील ग्रामस्थांची सुश्राव्य भजने सादर करण्यात आली. त्यानंतर रात्रौ १० वा. मातोंड-पेंडूर येथील जय संतोषी माता दशावतारी नाट्य मंडळाचा कृष्ण कवच हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगालाही नाट्यरसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.



