सावंतवाडी : शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना नाहक त्रास देऊन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नासिर अहमद इस्माईल शेख (वय 57, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याला सिंधुदुर्ग पोलिसांनी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांनी हा आदेश जारी केला आहे.
नासिर शेख यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात अनेक दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. तो महिलांना त्रास देऊन परिसरात दहशत निर्माण करत होता आणि त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपारची कारवाई करण्यात आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांकडे सादर केला होता. त्यानुसार नासिर शेख याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. त्याला यासंबंधीची रीतसर नोटीस बजावली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.