नवी दिल्ली : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानचा जळफळाट झाला असून, पाकिस्तानच्या नेत्यांकडून सातत्यानं युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. दरम्यान भारतानं गेल्या 24 तासांमध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या असून, कंबर मोडली आहे. दहशतवादी हल्ला झाल्यापासून ते आजपर्यंत पाकिस्तानविरोधात कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
पाकिस्तानी जहाजांना प्रतिबंध – यासंदर्भात डीजीएसकडून आदेश जारी करण्यात आला आहे, या आदेशानुसार पाकिस्तानी झेंडा असलेल्या कोणत्याही जहाजाला भारताच्या कोणत्याही बंदरामध्ये प्रवेश देण्यात येणार नाहीये, सुरक्षिततेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं डीजीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयात -निर्यात बंद – भारतानं पाकिस्तानविरोधात आणखी एक मोठं पाऊलं उचललं आहे. सर्व प्रकारची आयात, निर्यात बंद करण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.
टपाल सेवा बंद – भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित सर्व प्रकारची टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच पाकिस्तानी चॅनल आणि वेबसाईट देखील बॅन करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द – पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून, त्यांना तातडीनं भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सिंधू जल करार स्थगित – भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवाई हद्द बंद – भारतानं पाकिस्तानच्या विमानासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानी विमान कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो, हवाई हद्द बंद झाल्यामुळे विमानांना दुरून प्रवास करावा लागणार आहे, याचा मोठा फटका त्यांना इंधनाच्या रूपानं बसू शकतो.