वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडे गावातील ऐतिहासिक होडावडे चावडी येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व होडावडे येथील दळवी समाज यांची संयुक्त विद्यमानाने आज रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी मार्गदर्शक फालकांचे अनावरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली, नष्ट झालेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे होडावडे चावडी. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावातील होडावडे चावडीला विजयनगर राजघराण्यापासूनचा इतिहास असून सुद्धा जिल्ह्यातील अनेकजणांना याबाबत किंचित माहिती सुद्धा नाही. होडावडे चावडीच्या ठिकाणी त्यावेळच्या इमारतींचे अनेक अवशेष तसेच पुरातन समाध्या आहेत. तसेच जवळच असलेल्या चावडीच्या चाळ्याच्या ठिकाणी सदरेचे बांधकाम आहे.
अशा या ऐतिहासिक ठिकाणी होडावडे येथील दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे गेल्यावर्षीपासून संवर्धन कार्य सुरु असून गेल्या वर्षभरात या ठिकाणची स्वच्छता करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून होडावडे चावडी व चावडीच्या चाळा येथे माहितीफलक तसेच तळवडे-होडावडे-वजराट मार्गावर मार्गदर्शक फलक लावण्यात आला. प्रत्येक फलकावर क्यूआर कोड देण्यात आलेला असून या क्यूआर कोडमार्फत दुर्ग प्रेमींना होडावडे चावडीचा इतिहास तसेच इतर माहिती समजण्यास मदत होणार आहे.
या माहिती फालकांसाठी सोहर्ष सरिता विजय खानोलकर, नारायण पुंडलिक नाईक, देवयानी साजिरी बाबाजी परब, अस्मि सुप्रिया सुनिल धोंड, अंबिका फॅब्रिकेशन चे मालक रमेश केनवडेकर, अमोल कारेकर, माधुरी पटाडे यांनी सहकार्य केले.
या मोहिमेला चंद्रकांत दळवी, नारायण नाईक, राजा दळवी, राजन दळवी, दिगंबर दळवी, विनय दळवी, श्रीधर दळवी, संजय दळवी, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे समृद्धी पेडणेकर, किरण सावंत, साईप्रसाद मसगे, प्रसाद पेंडूरकर, समिल नाईक, गणेश नाईक उपस्थित होते. उपस्थितांना अल्पोपहराची सोय राजा धुरी यांनी केली. दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.