लंडन : कसोटी क्रिकेटमध्ये आता सध्या इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटचा तांडव पाहिला मिळत आहे. कारण श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली. पहिल्या डावानंतर रूटने दुसऱ्या डावातही आश्चर्यकारक कामगिरी करत शानदार शतक झळकावले आणि यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
जो रूट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. रूटने ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडला आहे. लंडनमधील लॉर्ड्सवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रूटने 103 धावा केल्या. या शतकी खेळीने त्याने कुकचा विक्रम मोडला. इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 196 धावा करून ऑलआऊट झाला होता. लॉर्ड्स कसोटीत रूटने दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावातही शतक झळकावले. रूटने 143 धावांची इनिंग खेळली होती. यादरम्यान त्याने 206 चेंडूंचा सामना करत 18 चौकार मारले. आता दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले आहे. रुटने 121 चेंडूंचा सामना करत 103 धावा केल्या. या खेळीत 10 चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद होईपर्यंत 251 धावा केल्या. या डावात हॅरी ब्रूकने 37 धावांचे योगदान दिले.
रूटने मोडला कूकचा विक्रम –
जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 145 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके आणि 65 अर्धशतकेही झळकावली आहेत. रूटच्या आधी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. कुकने 161 कसोटी सामन्यांमध्ये 33 शतके आणि 57 अर्धशतकेही केली आहेत. केविन पीटरसन इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 104 सामन्यांमध्ये 23 शतके आणि 35 अर्धशतकेही ठोकली आहेत.