ठाणे : कळवा येथील रायझिंग स्टार प्ले ग्रुप व नर्सरी स्कूलच्या विद्यार्थी व पालक वर्ग तसेच शिक्षकांनी देशभक्तीपर जनजागृती रॅली काढली. स्कूलच्या प्रिन्सिपल ममता मसूरकर यांच्या अभिनव संकल्पनेतून ही रॅली करण्यात आली. दरम्यान या रॅलीचे नेतृत्व स्वतः ममता मसूरकर यांनी केले.
दरम्यान स्कूलचे सर्व विद्यार्थी यावेळी विविध महापुरुषांच्या वेशात सुंदर असे नटून-थटून रॅलीत सहभागी झाले होते. ज्यामुळे या जनजागृती रॅलीला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले. ‘वंदे मातरम’, भारत माता की जय!’, ‘हम सब एक हैं.!’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण कळवा परिसर दणाणून सोडला.
रॅलीत सहभागी झालेल्या पालकांचा उत्साह यावेळी विशेष आनंददायी ठरला. परिसरातील नागरिकांनी या रॅलीचे विशेष कौतुक केले. विविध महापुरुषांच्या वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून उपस्थितांमध्ये एक वेगळे चेतन्य निर्माण झाले.
रायझिंग स्टार या स्कूलच्या प्रिन्सिपल ममता मसूरकर यांच्या या आगळ्यावेगळ्या व अभिनव उपक्रमाचे साऱ्यांनीच कौतुक करत अभिनंदन केले.
महिला लेझीम पथकाने जिंकली मने –
यावेळी महिला लेझीम पथकाने सुरेख व तालबद्ध असे लेझीम नृत्य सादर केले ज्यामुळे उपस्थित कळवावासियांची त्यांनी मने जिंकली.