Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

अप्रेंटिसशिपद्वारे कौशल्य विकासाला चालना.! – पी. एन. जुमले ; ‘पीसीसीओई’ मध्ये अप्रेंटिसशिप भरती मेळाव्यात ९३ कंपन्यांचा सहभाग, साडेसहा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी.

पिंपरी – चिंचवड : औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता ओळखून भारत सरकारने अप्रेंटिसशिप योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव शिवाय विद्यावेतन मिळते तर कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होते. येत्या काळात बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग केंद्र अधिकाधिक लोक केंद्रीत आणि प्रभावशाली करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई), भारत सरकारचे बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीसीओई, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे अप्रेंटीसशीप भरती मेळाव्याचे आयोजन शनिवारी (२४ ऑगस्ट) करण्यात आले होते. यावेळी बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे उपसंचालक एन. एन. वडोदे, केएसबी कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक राहुल माळी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर 789 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

‘बोट’ बरोबर महाराष्ट्रातील साडेचार हजारांहून अधिक कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. तर, आतापर्यंत ८५ हजार विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप रोजगार मिळाला असून अनेकांना या ट्रेनिंगमुळे नियमित रोजगार मिळाला आहे, असे एन. एन. वडोदे यांनी सांगितले.

औद्योगिक कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. अप्रेंटिसशिप भरती मेळाव्याच्या माध्यमातून ही गरज भरून काढली जाते. आमचा अनुभव असे सांगतो की, डिप्लोमा झालेले विद्यार्थी कंपनी मध्ये उत्तम आणि प्रमाणिक काम करत आहेत, असे राहुल माळी यांनी स्पष्ट केले.

या भरती मेळाव्यात केएसबी लिमिटेड, कायनेटिक ह्युंदाई, रॉस प्रोसेस, बेलराइज, थरमॅक्स, ब्ल्यू स्टार, एसकेएफ, पियाजिओ, बजाज फायनान्स, मुबिया ऑटोमोटिव्ह, सुमॅक्स, बीव्हीजी इंडीया, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यासारख्या ९३ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. साडे सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार तर्फे व कंपनीतर्फे दरमहा आकर्षक मानधन दिले जाते. तसेच अप्रेंटीसशीपचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतांश कंपन्या पूर्णवेळ कर्मचारी म्हणून पुढील नियुक्ती देतात, असे डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी सांगितले.

डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी भरती मेळाव्यासाठी आलेल्या कंपनी प्रतिनिधींचे स्वागत करून मेळाव्याची आवश्यकता आणि भुमिका विषद केली.

या भरती मेळाव्या करिता पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

भरती मेळाव्याच्या आयोजनात पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दीपक पवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. अजित शिंदे, प्रा. हीना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर, सर्व विभागातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन रोशनी गोडबोले यांनी केले.
—–

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles