सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनशी, ता. सावंतवाडी येथे 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थ्यांकडून शाळेतील शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कैवल्य शिधये यश सावंत,बाळकृष्ण गवस या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश जाधव आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आजची पिढी म्हणजे उद्याचं देशाचं भवितव्य असते. हे देशाचं भवितव्य घडविण्याकरिता शिक्षक विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. तसेच नीतिमत्तेसारखी अत्यावश्यक मूल्ये रूजविण्याकरिता सदैव कार्यरत असतात. एकप्रकारे आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. ‘शिक्षकांचे सक्षमीकरण: लवचिकता मजबूत करणे, टिकाऊपणा निर्माण करणे’ ही यंदाची शिक्षक दिनाची संकल्पना आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्य सावंत यांनी तर आभार कैवल्य शिधये यांनी मानले. विद्यार्थ्यांनी स्वतः एकूण पाच वर्गांचे वेळापत्रक तयार करून अभिरूप शिक्षक म्हणून अध्यापन करण्याचा अनुभव घेतला. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक बाबुराव पास्ते आणि पदवीधर शिक्षक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
ADVT –