धुळे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूक या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा महायुतीमध्ये प्रवेश सुरू असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते आणि पदाधिकारी आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. याचा सर्वात मोठा फटका हा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती, मात्र तरी देखील हे पक्ष प्रवेश सुरूच आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
धुळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत रवींद्र देशमुख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे, तर दुसरीकडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



