वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे ऑनलाईन मार्गदर्शन मालिकेचे आयोजन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त या आँनलाईन मार्गदर्शन मालिकेचे पहिले मार्गदर्शन आज आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील तेरा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाजशरण वृत्तीने कार्यरत आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.
आज मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आँनलाईन मार्गदर्शन मालिका सुरू करीत आहोत. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला गुगलमीटच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
प्रत्येक महिन्यातील हे दोन दिवस तज्ञ महानुभाव व ज्येष्ठ पदाधिकार्यांच्या प्रबोधनात्मक चर्चासत्रांमधून अनेक विषयांवर आपल्याला मार्गदर्शन मिळणार असून शंकांचे निरसन होणार आहे.
आज पहिले मार्गदर्शन संस्थेचे राज्य संघटक श्री.सर्जेराव जाधव हे सातबाराचे वाचन कसे करावे या विषयावर रात्री ठिक ९.०० ते १०.०० या वेळेत करणार आहेत.
To join a meeting on Google Meet, click this link: https://meet.google.com/tqi-oefp-pwa
या गुगलमिट लिंक व्दारे मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड व सचिव श्री. अरुण वाघमारे व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे.