सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे आयोजित आणि डॉ. अरविंद खानोलकर कुटुंबीय पुरस्कृत कै. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात गौरी राजन गावडे हिने तर मोठ्या गटात प्रांजल सतीश तेरसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वाचन मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत पाचवी ते सातवी या लहान गटात जिल्हा परिषद शाळा कास नं. १ ची विद्यार्थिनी गौरी गावडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. याच गटात सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले विद्यालयाची सर्वेक्षा नितिन ढेकळे हिने द्वितीय तर मळगाव इंग्लिश स्कूलची दुर्वा गोपाळ नार्वेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. गार्गी किरण सावंत (शांतीनिकेतन स्कूल, सावंतवाडी) आणि स्वरा कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कूल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आठवी ते दहावी या मोठ्या गटात कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजल सतिश तेरसे हिने प्रथम क्रमांक संपादन केला. मळगाव इंग्लिश स्कूलची तनिष्का प्रमोद राऊळ हिने द्वितीय, तर सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलची अस्मी प्रविण मांजरेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे विद्यार्थी दिव्यल दिनेश गावडे आणि मैथली मनोहर सावंत यांना या गटात उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्पर्धेचे प्रायोजक व प्रमुख अतिथी मा. डॉ. मिलिंद अरविंद खानोलकर व सौ. अपर्णा अरविंद खानोलकर यांच्या शुभहस्ते कै. डॉ. मालती खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सौ. अपर्णा खानोलकर यांनी स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मुलांनी वाचनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे स्पर्धेतील सहभागी मुलांना जाण्या-येण्याचा एस.टी. प्रवास खर्च तसेच अल्पोपहारही देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. एन. डी. कार्वेकर, सौ. ललिन प्र. तेली, श्री. शंकर शां. प्रभू आणि श्री. किशोर अ. वालावलकर यांनी केले. त्यांनी सहभागी स्पर्धकांना विषयाच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाला वाचन मंदिराचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गावडे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते. श्री. गोपाळ नार्वेकर, कु. जान्हवी अमरे व कर्मचारी वर्गाने कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार कार्यवाह सौ. स्नेहा खानोलकर यांनी मानले.



