✍️ रूपेश पाटील.
- सावंतवाडी : आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार ॲड. सायली दुभाषी व प्रसाद नाईक यांच्या प्रचारासाठी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रचंड जनसमुदाय प्रचार करताना नजरेस पडला. एकंदरीत हा जनसागर पाहता विरोधकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक बांधवांची या ठिकाणी निर्णायक मतं असून बहुसंख्य मतदार बांधव ॲड. सायली दुभाषी व प्रसाद नाईक यांच्या सोबत असल्याचे जाणवले. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी देखील आपले प्रचंड समर्थक आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन रॅलीत उत्साहवर्धक वातावरण निर्मिती केली. एकंदरीत ॲड. सायली दुभाषी यांची ही जनमानसातील ताकद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली असेल. गेल्या काही वर्षांपासून सौ. दुभाषी यांचे पती बाबल्या दुभाषी व स्वतः सायली दुभाषी हे दांपत्य अनेक गोरगरीब व सामान्य माणसांच्या सुख-दुःखात समरस होत असतात. त्याचीच ही पोचपावती म्हणावी लागेल.

- यावेळी दस्तर खुद्द आमदार दीपक केसरकर यांनी “आमच्या या प्रभागातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील सोबतच नगराध्यक्षपदी ॲड. नीता सावंत – कविटकर या देखील मोठ्या लीडने विजयी होतील”, असा आशावाद व्यक्त केला. हे आजचे सकारात्मक चित्र जरी नजरेसमोर पडले असले तरी निवडणुकीत कोणतीही रिस्क न घेणारा पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भारतीय जनता पार्टीची रणनीती काय असणार?, हे आताच सांगणे कठीण आहे. कारण शेवटच्या दोन दिवसात साम-दाम दंड भेदाचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रभागात प्रचंड रंगत पहावयास मिळणार आहे. हे सारे चित्र तीन तारखेला स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी ॲड. सायली दुभाषी यांचे पारडे अत्यंत जड असल्याचे जाणवते.



