सावंतवाडी : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३/१२/२०२५ पासून असनिये येथील पूर्व प्राथमिक शाळा, असनिये येथे पाच दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमधील प्रगतीशील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांची उपस्थिती –
प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्राला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माननीय श्री अनिकेत कदम (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी माननीय श्री गोरखनाथ गोरे (तालुका कृषी अधिकारी, सावंतवाडी), श्री युवराज भुईम्बर (मंडळ कृषी अधिकारी, बांदा), श्री अजमुद्दिन सरगुरु (उप कृषी अधिकारी), श्रीमती मनाली परब (उप कृषी अधिकारी), श्री मिलिंद सुरेश निकम (सहाय्यक कृषी अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक हेमंत कुमार तुकाराम डूबरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
प्रशिक्षणाचे स्वरूप –
या पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये मधमाशी पालनाविषयी सखोल मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामध्ये खालील प्रमुख विषयांवर विस्तृत माहिती दिली जात आहे:
मधमाशीचा इतिहास आणि तिचे महत्त्व, मधमाशीचे विविध प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये, घर बांधण्याच्या मधमाशीच्या पद्धती आणि नैसर्गिक प्रक्रिया, उत्कृष्ट मध तयार करण्यासाठी लागणाऱ्या फुलांची आवश्यकता (परागीभवन आणि वनस्पतींचे ज्ञान)., यशस्वी मधमाशी पालनासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणे आणि त्यांचे तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होत आहे.
प्रशिक्षण शेतीसोबत जोडधंदा म्हणून मधमाशी पालन सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



