- रूपेश पाटील
सावंतवाडी : गेले अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीत विशेषत : सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरू आहे. काही वेळा माध्यमांसमोरही महायुतीत असलेले मतभेद उघडकीस आले आहेत.
मात्र उद्या सावंतवाडी येथील दोन कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
मागील २ महिन्यात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही कोणाचेही नाव न घेता युतीधर्म समोरचे लोकं का पाडत नाही याबाबत चिंता व्यक्त केली होती.?
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, माजी आमदार राजन तेली, तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनीही पत्रकार परिषदा घेत मंत्री केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मात्र उद्या महायुतीचे दोन दिग्गज नेते एकत्र येत आहेत. एकाच व्यासपीठावर दोन्ही नेते एकत्र येऊन काय बोलणार याकडे आता लक्ष लागून आहे.
सावंतवाडी येथे भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोफत बसविण्यात येणाऱ्या ‘रुफ टॉप सोलर वीज निर्मिती संच’ साहित्य वितरण कार्यक्रम आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी मतदारसंघातील 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण एकत्र येणार आहेत.
अनेक दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील अंतर्गत धुसपूस आता तरी शांत होणार का?, पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय बोलणार?, भारतीय जनता पार्टीच्या दोन युवा नेत्यांकडून जनहिताच्या होणाऱ्या कार्यक्रमाबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.