कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार ओसरगाव नं.१ या प्रशालेचे उपक्रमशील, आदर्श मुख्याध्यापक किशोर कदम यांना नुकताच जाहीर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण व आदर्शदायी शैक्षणिक वाटचाल,तसेच विविध उपक्रमांद्वारे ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत. सामाजिक उपक्रमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्याला पाहायला मिळतात.या शाळेत त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रशालेमध्ये सर्वांगीण गुणवत्तेचा एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी ते निर्माण करण्याचे कार्य या प्रशालेमध्ये करत आहेत. नवोदय परीक्षा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, साहित्य क्षेत्र,अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांच्या प्रयत्नातून शाळेचा आगळावेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. असे मनोगत ग्रामपंचायत सरपंच सौ.सुप्रिया कदम यांनी व्यक्त केले.
उपसरपंच गुरूदास सावंत, ग्रामसेवक तळवडेकर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सौ.आंगणे, गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गुरूदास सावंत यांनी किशोर कदम यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.