सावंतवाडी : आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले आहेत. ३१:१९ च्या फाॅर्मुल्याची चर्चा होत आहे. पण एकंदर नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आत्ताच पार पडलेल्या २९ महापालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची गरजच काय? असा प्रश्न पडतोय. काहीही झाले तरी भाजपच सगळ्या जागांवर जिंकणार असंच निवडणूक आयोगासह सगळ्या यंत्रणांचे नियोजन असेल तर निवडणुका हव्यात कशाला?, असा सवाल ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
डॉ. परुळेकर पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० पैकी काही जागा बिनविरोधच निवडून येतील किंवा आणल्या जातील.मग मतदार याद्यांमध्ये घोळ घातला जाईल, काहींचे मतदान गायब होईल तर काहींचा बुथ बदललेला असेल पैशाचा तर अवकाळी पाऊस धो धो कोसळेल आणि सर्वच्या सर्व जागा भाजपच जिंकेल असंच स्क्रीप्ट जर लिहिलेलं असेल तर निवडणुकीचा तमाशा हवा कशाला? असा निराशाजनक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आज आहे.
हो!, पण त्यातील पाच दहा हजार रुपयांची पाकिटे मिळतील म्हणून जे वाट बघत असतील त्या मतदारांचा मात्र हिरमोड नक्कीच होईल. लोकशाहीचा हा तमाशा बघत राहण्याशिवाय सामान्य जनतेला पर्याय नाही हेच खरे, असेही डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.



