सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप नेतृत्वाविरोधात उघड बंड पुकारले आहे.
स्थानिक सक्षम उमेदवारांना डावलून बाहेरचा उमेदवार लादल्याचा गंभीर आरोप करत प्रमोद गावडे यांनी हे बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे तळवडे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळवडे मतदारसंघात भाजपकडून संदीप गावडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत होता. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रमोद गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून या असंतोषाला उघड स्वरूप दिले आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रमोद गावडे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,
“तळवडे, मळगाव, नेमळे आणि निरवडे यांसारख्या मोठ्या व प्रभावी गावांतील सक्षम स्थानिक नेतृत्वावर अन्याय करण्यात आला आहे. जनतेच्या भावना डावलून बाहेरचा उमेदवार लादण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा अन्याय सहन न होणारा असल्यानेच मी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.”
आजवर कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेल्या प्रमोद गावडे यांनी मात्र पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर उघड नाराजी व्यक्त केली.
“माझी ही लढाई कोण्या व्यक्तीविरोधात नसून, एका अन्यायकारक आणि अहंकारी प्रवृत्तीविरोधात आहे. ही प्रवृत्ती पराभूत केल्याशिवाय मी थांबणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रमोद गावडे यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे स्पष्ट झाले आहे.



