सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुती अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी आज सोनुर्ली येथील ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. सोनुर्ली गावाच्या आणि संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी जनतेने मतरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन करत या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाने माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांना उमेदवारी दिली आहे, तर पंचायत समितीसाठी सचिन बिर्जे यांना संधी दिली आहे. दोन्ही उमेदवार तरुण, तडफदार आणि सुशिक्षित असल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता असून त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आज सोनुर्ली येथे प्रचाराचा शुभारंभ करताना विक्रांत सावंत यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि जनतेकडून मिळणारे प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. युवाशक्ती आणि सर्वसामान्य जनतेच्या जोरावर सोनुर्ली गावासह संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मला मिळावी, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनीही यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंचायत समिती हा ग्रामीण विकासाचा मुख्य दुवा असल्याने गावातील स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रचार शुभारंभाप्रसंगी गावचे प्रमुख मानकरी बाळा गावकर, रमेश गावकर, दशरथ गावकर, सचिन गावकर, नागेश गावकर यांच्यासह रेश्मा सावंत, सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर, विष्णू नाईक, विजय पालेकर, प्रवीण गाड, बबली मालपेकर आणि महायुतीचे असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांनी आता आपला वैयक्तिक प्रचार आणि घरोघरी भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून मतदारसंघात महायुतीचे पारडे जड होताना दिसत आहे.



