सावंतवाडी : “अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या युवकांसाठी दिशादर्शक दीपस्तंभ आहेत. कष्ट, शिस्त, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे त्यांनी संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची कल्पनाच करता येत नाही,” असे उमाकांत वारंग यांनी सांगितले.
आजच्या वेगवान आणि अस्थिर राजकीय वातावरणात अजितदादांसारख्या अनुभवी नेतृत्वाची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. ग्रामीण भागापासून शहरी युवकांपर्यंत त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. विकास, पाणीप्रश्न, सहकार आणि प्रशासन या विषयांवर त्यांची ठाम भूमिका नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे.
“महाराष्ट्राचा युवक आज ज्या उंचीवर उभा आहे, त्यामागे अजितदादांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची छाप आहे. अशा नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात,” असेही वारंग यांनी भावुक होत नमूद केले.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अजितदादा पवार यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या कार्यामुळे प्रेरित झालेली पिढी कायम ऋणी राहील, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.



