नाराज प्रमोद गावडे यांची शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांनी घेतली भेट.! ; राजकीय वर्तुळात रंगली मोठी चर्चा.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी न मिळाल्याने भावूक झालेले सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आणि कट्टर राणे समर्थक प्रमोद गावडे यांची शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी निरवडे येथे जाऊन भेट घेतली. अर्ज मागे घेताना प्रमोद गावडे यांना अश्रू अनावर झाले होते.  त्या घटनेनंतर आ. निलेश राणे यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
प्रमोद गावडे हे गेल्या तीन दशकांपासून नारायण राणे यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. यंदाच्या निवडणुकीत ते तळवडे मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महायुतीने या जागेवर स्थानिक उमेदवाराला संधी न दिल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, पक्षाची शिस्त आणि नेत्यांवरील निष्ठेपोटी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली माघार घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आणि समर्थकांसमोर आपली भूमिका मांडताना गावडे यांना भावना अनावर झाल्या. “प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणात किंमत उरली नाही का?” अशी उद्विग्न भावना व्यक्त करत ते रडले होते. ​आपल्या ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्याची ही अवस्था पाहून आमदार निलेश राणे यांनी तातडीने निरवडे येथे गावडेंचे निवासस्थान गाठले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हे देखील उपस्थित होते. निलेश राणे यांनी गावडेंचे सांत्वन करत त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. प्रदीर्घ काळ सोबत असलेल्या कार्यकर्त्याची नाराजी दूर करणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल याची ग्वाही देणे हा या भेटीमागचा मुख्य उद्देश असल्याचे समजते.
​गावडे यांच्यासारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात राणे यांना यश आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles