सावंतवाडी : वसई–विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात एका महिलेवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याने दिलेल्या गोपनीय माहितीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्पर कारवाई करत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली.
या कारवाईत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) निलेश परब व हवालदार मनोज राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (वय ५१) असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी त्यास नालासोपारा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
दरम्यान, नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पुढील चौकशी सुरू आहे. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फरार आरोपीला अटक करण्यात यश मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, दोन जिल्ह्यांतील पोलिसांमधील समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.



