मुंबई : आयुष म्हात्रे याने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. भारताचा हा एकूण सहावा अंडर 19 वर्ल्ड कप ठरला. भारताला वर्ल्ड कप चॅम्पियन करण्यात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र ओपनर वैभव सूर्यवंशी याने यात सर्वाधिक योगदान दिलं. वैभवने इतर सामन्यांसह फायनलमध्येही धमाका केला. वैभवने फायनलमध्ये तब्बल 175 धावांची खेळी केली. वैभव यासह भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च खेळी करणारा पहिला तर एकूण तिसरा फलंदाज ठरला.
वैभव सूर्यवंशीचा मोठा सन्मान!
तसेच वैभवने केलेल्या 175 धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंडसमोर 412 धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यानंतर भारताने इंग्लंडला 311 रन्सवर ऑलआऊट करत सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला. वैभव सूर्यवंशीला त्याने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वैभवची मानाच्या संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली आहे.
12 खेळाडूंची निवड –
आयसीसीने पंरपरेनुसार अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघात वैभव सूर्यवंशी याचा समावेश केला आहे. आयसीसीकडून प्रत्येक स्पर्धेनंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करुन संघ जाहीर केला जातो. त्यानुसार आयसीसीने यंदा अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून 12 खेळाडूंची निवड करत संघ जाहीर केलाय. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
त्रिसदस्यीय समितीकडून निवड –
इयन बीशप, एन्डी फ्लॉवर आणि टेलफोर्ड या वाईस या त्रिसदस्यीय समितीने या 12 खेळाडूंची निवड केली आहे. या 12 सदस्यीय संघात वैभव व्यतिरिक्त कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल या 2 भारतीयांचा समावेश आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार थॉमस रेव्ह याला या टीम ऑफ द टुर्नामेंटच्या कर्णधार करण्यात आला आहे.
आयसीसीने निवडलेल्या 12 खेळाडूंमध्ये कोण कोण?
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम संघ : वैभव सूर्यवंशी, विरण चामुदिथा, फैसल खान शिनोजादा, थॉमस रेव्ह (कर्णधार आणि विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, बेन मेस, कनिष्क चौहान, नूरिस्तानी ओमरझई, विटेल लॉस, अली रझा, मॅनी लुम्सडेन आणि हेनिल पटेल.



