मालवण : पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या कोकणाच्या निसर्गसंपन्न किनारपट्टीत आणखी एक मनमोहक दृश्य पाहायला मिळाले आहे. मालवण समुद्रात तब्बल ७५ डॉल्फिनच्या समूहाने विहार केल्याचे दृश्य समोर आले आहे. समुद्राच्या निळ्याशार पाण्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने डॉल्फिन जलक्रीडा करताना दिसल्याने हा नजारा विशेष आकर्षण ठरला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या X अकाऊंटवर हा मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे.
कोकण किनारपट्टी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण आणि जैवविविधतेमुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. अशातच डॉल्फिनचा एवढा मोठा समूह एकत्रितपणे दिसणे ही दुर्मिळ आणि आनंददायी घटना मानली जात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास हा डॉल्फिन समूह समुद्रात खेळताना आणि उड्या मारताना पाहायला मिळाला. या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले असून ते सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची मानली जात असून, यामुळे मालवण आणि सिंधुदुर्ग परिसरातील डॉल्फिन सफारीला अधिक चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“येवा कोकण आपलाच आसा!” या उक्तीप्रमाणे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि सागरी जीवसृष्टी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



