सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा बदलत्या हवामानाचा व अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा व काजू पिकांना बसला आहे. मोहोर गळती व फळधारणा न होणे यामुळे बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आमदार केसरकर यांनी नमूद केले आहे की, नोव्हेंबर महिन्यात आंबा व काजू झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता; मात्र त्यानंतर तापमानातील चढ-उतार, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मोहोर गळून पडला. परिणामी फळधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले उत्पादन वाया गेले आहे.
दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. बागायतदारांनी खते, औषधे, कीडनाशके तसेच मशागतीसाठी सहकारी संस्था व बँकांकडून कर्ज घेतले असून उत्पन्नावर पाणी फिरल्याने परतफेडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी व फळ बागायतदारांना शासनामार्फत तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.



