सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येथील जगन्नाथ भोसले गार्डन येथे रविवारी (ता. ८ मार्च २०२६) सायंकाळी ४ ते ८ या वेळेत उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे तसेच त्यांना आत्मनिर्भरतेकडे प्रेरित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, मनोरंजक फनी गेम्स तसेच युवतींनी स्वप्रेरणेने सादर केलेले छोटे-छोटे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान जपत समाजात आत्मविश्वासाने पुढे यावे आणि आत्मनिर्भर बनावे, या दृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आ. दीपक केसरकर , शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा, महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या आत्मसन्मानाला बळ मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी ता. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जगन्नाथ भोसले गार्डन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. व नोटरी निता सावंत कविटकर यांनी केले आहे.



