देवगड : कोटकामते गावात बेकायदेशीर माती उत्खननाचा प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत विरेंद्र कांबळी यांच्या मालकीचा डंपर व जेसीबी जप्त केला. जागरूक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार रंगेहात पकडला गेला.
रविवारी पहाटे ग्रामस्थांनी सापळा रचून कोटकामते परिसरात विनापरवाना माती उत्खनन सुरू असल्याचे उघड केले. विरेंद्र कांबळी यांच्या मालकीचा डंपर व जेसीबी वापरून कोणतीही शासकीय परवानगी न घेता मातीचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तत्काळ वाहने अडवून हा प्रकार उघडकीस आणत देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
दरम्यान, त्या दिवशी पालकमंत्री यांचा देवगड दौरा असल्यामुळे तहसीलदार पवार यांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असतानाही त्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेतली. महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी अनुपस्थित असल्याने तहसीलदारांनी दुसऱ्या सजा येथील महसूल अधिकारी संदीप सरोदे व श्री. वंजारे यांना रविवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही तातडीने कोटकामते येथे पाठवत धडक कारवाईचे आदेश दिले.
विशेष म्हणजे, यापूर्वीच दि. ०६.०३.२०२६ रोजी कोटकामते ग्रामस्थांच्या तक्रारीवरून महसूल विभागाने या ठिकाणी पंचनामा करून विनापरवाना मृदा उत्खननाबाबत संबंधितांना मंडळ अधिकारी पावसकर यांनी स्पष्ट समज दिली होती. मात्र प्रशासनाच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत दुसऱ्याच दिवशी पुन्हा अवैधरीत्या माती उत्खनन व वाहतूक सुरू ठेवण्यात आली.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी दि. ०८.०३.२०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजल्यापासून सापळा रचून बेकायदेशीर उत्खनन करणारा डंपर व जेसीबी रंगेहात पकडला. या घटनेची माहिती पोलीस पाटील श्री. गुरुनाथ मीठबांवकर, कोटकामते ग्रामपंचायत प्रभारी सरपंच श्री. गणेश घाडी तसेच माजी उपसरपंच श्री. विजय केशव कुडपकर यांना देण्यात आली.

महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचासमक्ष पाहणी करून जबाब नोंदवले. दोन्ही वाहनांचे तसेच चालकांचे कागदपत्र तपासले असता कोणतीही वैध परवानगी किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे तहसीलदारांनी तात्काळ दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले.
मात्र संबंधित विरेंद्र कांबळी यांनी वाहने जमा करण्यास टाळाटाळ करत प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांना सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी सुमारे १.३० वाजेपर्यंत अक्षरशः ताटकळत ठेवले. परिस्थिती चिघळू लागल्याने अखेर तहसीलदारांनी देवगड पोलीस निरीक्षकांची मदत घेत पोलीस फौजफाटा घटनास्थळी पाठवला.
पोलीस दाखल झाल्यानंतरही जेसीबी चालक पळून गेल्याचे तसेच डंपर सुरू होत नसल्याचे कारण देत वेळकाढूपणा करण्यात आल्याची माहिती मिळाली. अखेर सायंकाळी सुमारे ४ वाजता पंचनामा करून दोन्ही वाहनांचा ताबा पावतीद्वारे पोलीस पाटील गुरुनाथ मीठबांवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच संबंधितांना दोन्ही वाहने तातडीने तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे बेकायदेशीर माती उत्खननाचा हा प्रकार उघडकीस आला असून कोटकामते परिसरात सुरू असलेल्या अशा अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाने कठोर व निर्णायक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.



