सावंतवाडी : तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग अधिनस्त अभय केंद्र सावंतवाडी या कार्यालयातर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत विद्यालयात किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलनाने झाले.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, विधी सेवा प्राधिकरण सावंतवाडीच्या ॲड. पूजा जाधव, तालुका संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सहाय्यक संरक्षण अधिकारी श्वेता बगळे, समुपदेशन केंद्र सावंतवाडीच्या समुपदेशक तृप्ती धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲड. पूजा जाधव यांनी मुलांना पॉक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले.तसेच पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी सायबर सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्या मध्ये महिला व बालविकास विभागाच्या माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले. आभारप्रदर्शन श्वेता बगळे यांनी केले.



