सिंधुदुर्गनगरी : बनावट HIV चाचणी, उपचार व निदान प्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंदना गणपत राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.
या उपोषणाची सुरुवात १० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली आहे. या आंदोलनाद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांनुसार, HIV आणि कावीळ तपासणी शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मध्ये न घेता खाजगी ठिकाणी घेण्यात आलेल्या कथित बोगस शिबिरांची तपासणी समितीमार्फत कसून चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा. तसेच बनावट HIV चाचणीपत्रक तयार करणाऱ्या संस्थांवर व संबंधित प्रशासकीय यंत्रणांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार २०२२ साली गणपत सहदेव राणे यांना HIV लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या पत्नीची तात्काळ HIV चाचणी न करता २०२४ साली बोगस तपासणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे २०२२ ते २०२५ या कालावधीत कार्यरत असलेल्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच HIV समुपदेशक, संबंधित संस्था व प्रशासकीय यंत्रणांनी कोणाच्या सांगण्यावरून बोगस सल्ले दिले याचीही चौकशी करून तपास समितीने तात्काळ अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व मागण्या मान्य करून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही वंदना गणपत राणे यांनी दिला आहे.



