दोडामार्ग : तालुक्यातील झोळंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेली पालक सभा उत्साहपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या सभेला दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विशेष म्हणजे, याच शाळेतून त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असल्याने त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळेच भावनिक महत्त्व प्राप्त झाले.
सभेच्या निमित्ताने शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या श्रीम. दिपाली गवस यांनी शाळेला दिलेल्या Interactive Smart Digital Board या आधुनिक शैक्षणिक साधनाबद्दल त्यांचा मनःपूर्वक गौरव करण्यात आला. तसेच उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचाही शाळेच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, अशा योगदानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे खुली होत असल्याचे मत व्यक्त केले. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक, समजण्यास सोपे आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळणार असल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.
कार्यक्रमात आणखी एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांच्या “निपुण माता” म्हणून निवड झालेल्या मातांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत, घरातील शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण पाठबळ याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत, “याच शाळेने मला घडवले, इथूनच माझ्या शिक्षणाचा पाया रचला गेला. त्यामुळे या शाळेच्या प्रगतीत हातभार लावता येतो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, अभिमान आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकल्प यांच्यात पार पडला. पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवरांच्या सहकार्यामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवे मार्ग खुलत असल्याचे चित्र या सभेतून स्पष्टपणे दिसून आले.



