वेंगुर्ला येथे बालकांचे हक्क व अधिकार विषयक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

वेंगुर्ला : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बालकांचे हक्क व अधिकार तसेच बाल संरक्षण विषयक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे यशस्वीरित्या पार पडला.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (POCSO Act) या विषयांवर अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती मा. श्री. शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर तसेच प्रा. डॉ. सचिन परुळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शर्मिष्ठा सामंत व गीता परब, मुख्यसेविका, एकात्मिक बाल विकास सेवा योजना वेंगुर्ला यांचे विशेष सहकार्य लाभले.


कार्यक्रमात बोलताना सभापती शंकर घारे म्हणाले की, बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाचीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. अंगणवाडी व आशा सेविका या बालकांशी थेट संपर्कात असतात, त्यामुळे बालकांवरील अन्याय किंवा अत्याचार ओळखून योग्य वेळी संबंधित यंत्रणेला माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी सांगितले की, बालकांचे आरोग्य, सुरक्षा आणि संरक्षण यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी व आशा सेविका यांचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष किंवा आरोग्यविषयक समस्या वेळेवर ओळखून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना कायदेशीर तसेच आरोग्यविषयक बाबींचे योग्य ज्ञान मिळते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सचिन परुळकर म्हणाले की, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या यंत्रणांनी संवेदनशीलता आणि जबाबदारीने कार्य केले तरच बालकांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे प्रत्यक्ष काम करताना कायदेशीर माहिती आणि समुपदेशन कौशल्ये अधिक प्रभावीपणे वापरता येतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. पवित्रा धुरी यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व POCSO कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. मीनाक्षी नाईक, केस वर्कर, सखी वन स्टॉप सेंटर यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. रुपाली प्रभू, समुपदेशक, सखी वन स्टॉप सेंटर यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 तसेच सायबर क्राईम याविषयी माहिती दिली.
तर विश्वनाथ कांबळी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी ‘बालकांचे हक्क व अधिकार आणि माझी भूमिका’ या विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कानविंदे, सहायक संरक्षण अधिकारी, अभय केंद्र कुडाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सविता कांबळी, सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून बालकांसोबत काम करताना आवश्यक असलेले कायदेशीर ज्ञान, समुपदेशन कौशल्ये आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू शिणगारे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles