तेहरान : आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जासंकट ओढावल्याचं चित्र आहे. गेल्या 20 दिवसांपासून सुरु असलेली ही लढाई फक्त क्षेपणास्त्रं आणि ड्रोनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट ऊर्जा स्त्रोतांपर्यंत पोहोचली आहे. पुढील 13 वर्षे संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, एवढा गॅस ज्या केंद्रांवर उपलब्ध आहे तेच दोन केंद्रं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
इराणच्या दक्षिण भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स भागात इस्रायलानं जोरदार हल्ला केला. याला उत्तर म्हणून इराणनं कतारच्या रास लफान भागात प्रतिहल्ले केले. रास लफान भागात यामुळे मोठी आग लागली, मात्र तात्काळ ही आग नियंत्रणात आणण्यात आली. कतारचा हा भाग नॉर्थ डोम म्हणून प्रसिद्ध आहे. गॅस पुरवठ्यासाठी हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातील माऱ्यांमुळे युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपल्याचं दिसतंय.
भारताचं टेन्शन वाढलं –
भारत तेलाच्या आयातीबाबतीत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. एलएनजीच्या एकूण गरजेपैकी भारत 38 ते 40 टक्के गॅस कतारमधून आयात करतो. कतारच्या रास लफान भागातून प्रामुख्यानं या गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे कतारमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारताचंही टेन्शन वाढल्याचं दिसतंय.
रास लफानची वैशिष्ट्ये काय?
- जगातील सर्वात मोठं एलएनजी हब.
- जगभरातील देशांना एलएनजी आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांची इथून निर्यात.
- कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा.
- रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम.
- अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याचा धोका.
- तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता –
दरम्यान, या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरूवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर्स प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केला आहे. युद्ध सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत, मात्र हे युद्ध लवकर संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.



