सिंधुदुर्गच्या प्रगतीत ‘एसएसआय’चा महत्वाचा वाटा ! : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे गौरवोद्गार. ; किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्र वितरण व नूतन बॅचेसचे उद्घाटन. ; कर्तृत्ववान महिलांसह गुणवंतांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.

सावंतवाडी : “आजच्या एआय तंत्रज्ञानाच्या अन् धावपळीच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ‘एसएसआय कॉम्प्युटर’सारख्या खासगी संस्थांनी कौशल्य विकास क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत असून ‘एआय’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. कायम शिकण्याची वृत्ती आणि स्वतःला अपडेट ठेवल्यास यश नक्कीच मिळेल,” असा मौलिक सल्ला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण आणि सन २०२५-२६ च्या नवीन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर  सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, बॅ. नाथ पै संस्थानचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, इंद्रायणी शिक्षण संस्थाचे भूपतसेन सावंत, एसएसआय कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे व डॉ. सौ. गौरी तानावडे आदी उपस्थित होते.

जिद्द चिकाटी आणि स्वतःला अपडेट यशाची त्रिसूत्री! : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, जीवनात यश मिळवायचे असेल तर मनाशी प्रचंड जिद्द बाळगा. सातत्यपूर्ण परिश्रम करा. अपयशाने खचून जाऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे ज्ञान अध्ययावत ठेवा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल!, असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी दिला. दरम्यान त्यांनी अलीकडच्या काळात जिल्ह्याची होत असलेली प्रगती याबाबत समाधान व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असल्याचेही नमूद केले.

दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे पुढे म्हणाल्या, प्रशासकीय कामकाज सांभाळताना अनेकदा थेट जनसंपर्क कमी होतो, मात्र अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांशी संवाद साधता येतो. प्रशासनासोबतच जेव्हा अशा खासगी संस्था सामाजिक विकासासाठी काम करतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास होतो. एसएसआय संस्थेने २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान!

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, “महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला घराच्या मर्यादा ओलांडून स्वतःच्या विकासासाठी आणि समाजासाठी काम करत आहेत, याचा अभिमान वाटतो. अनेक आव्हाने असतानाही महिला जिद्दीने पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ह्या’ रणरागिणींचा झाला गौरव!

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. मुग्धा ठाकरे, तुळस मतदार संघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ, युवा उद्योजिका ऐश्वर्या शेठ कोरगांवकर यांच्यावतीने माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर या महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच अल्पावधीत अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य मिळविलेला सावंतवाडी येथील बाल धावपटू कु. कबीर नवीद हेरेकर याचाही विशेष सन्मान करण्यात आला.

       

या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कविता नाईक, सुखदा नाईक, मिताली केदार तसेच जाहिरात व्यवस्थापन व एसएसआय कम्प्युटरच्या ब्रँड अँबॅसेडर श्रीम. अनुष्का वर्दम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला’

 

ॲड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या मनोगतातून जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिला असून मागील सहा महिन्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीने विकासात्मक कामे करण्यात येत असून त्याचा सार्थ अभिमान या जिल्ह्याचा सजग नागरिक म्हणून आपल्याला असल्याचे श्री. पार्सेकर यांनी स्पष्ट केले. तसेच जेथे जेथे रचनात्मक काम असेल तेथे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा नक्कीच सहभाग असेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश गाळवणकर, मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते तसेच इंद्रायणी शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एसएसआय कॉम्प्युटरचे चेअरमन रघुनाथ तानावडे व डॉ. सौ. गौरी तानावडे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व उपस्थित अन्य मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर रघुनाथ तानावडे यांनी प्रास्ताविक पर भाषणात संस्थेची एकंदरीत वाटचाल विशद केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. यावेळी एसएसआय कॉम्प्युटरचे विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles