आनंद वार्ता! – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘१०८’ रुग्णवाहिकेने गुंफले सुखाचे ‘तोरण’. ; वायंगणी येथे महिलेची सुखरूप प्रसुती, कन्यारत्न आले दारी!, सेवा, कर्तव्य अन् मानवतेचा आदर्श!
- संजय पिळणकर.वेंगुर्ला : हिंदू नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असतानाच,वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे एका चिमुकलीच्या आगमनाने आनंद द्विगुणित झाला आहे. ‘महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८’ च्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णवाहिकेतच वायंगणी येथील सौ. रोशनी गोवेकर या महिलेची सुखरूप प्रसुती झाली.
सविस्तर वृत्त असे कि, गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी १०८ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून एका गर्भवती महिलेसाठी आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. यावेळी वेंगुर्ला येथील रुग्णवाहिका नुकतीच गोवा – बांबोळी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील ड्युटीवरून परतली होती.यावेळी दमलेल्या चालक व डॉक्टरांनी वेळ न घालवता रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी अवघ्या ८ मिनिटांत म्हणजेच ८:३० वाजता वायंगणी येथे रुग्णापाशी पोहोचली.
रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि प्रसुतीकळा तीव्र असल्याने महिलेला रुग्णालयात हलवणे शक्य नव्हते. अशा वेळी वेंगुर्ला येथील ईएमएसओ (EMSO) डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ आणि रुग्णवाहिका चालक साईसिद्धेश मेस्त्री यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जागीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या मदतीने ही प्रसुती यशस्वी पार पडली. मातेने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला असून बाळाचे वजन २.४ किलो आहे. प्रसूतीनंतर माता आणि बालकाला पुढील उपचारांसाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात (SDH) सुखरूप दाखल करण्यात आले आहे.
“वेळेवर मदत मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि बाळ सुरक्षित आहेत.१०८ मधील डॉक्टर आणि चालकाचे आम्ही मनापासून आभार मानतो.” अशी ऋणात्मक प्रतिक्रीया रुग्णाच्या नातेवाईकांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची ही ४४७ वी घटना ठरली आहे. सण – उत्सवाच्या दिवशीही तत्परतेने सेवा बजावणाऱ्या या देवदूतांचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
- Advertisement -
error: Content is protected !!