सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गगनभरारी! ; आर्थिक वर्षात तब्बल ₹ ७००० कोटींच्या व्यवसायाचा भव्य टप्पा यशस्वीरित्या पार!

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आर्थिक क्षेत्रात आपल्या भक्कम वाटचालीचा आणखी एक सुवर्ण अध्याय लिहित, चालू आर्थिक वर्षात तब्बल ₹ ७००० कोटींच्या व्यवसायाचा भव्य टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक कणा मजबूत करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या या बँकेने सातत्यपूर्ण नियोजन, पारदर्शक कारभार आणि ग्राहककेंद्री धोरण यांच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, लघुउद्योजक, स्वयंरोजगार करणारे युवक तसेच सर्वसामान्य ठेवीदार यांच्या विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली ही बँक आज आर्थिक स्थैर्य, विश्वासार्हता आणि प्रगतीचे प्रतीक बनली आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगातही जिल्हा बँकेने आपली विश्वासार्ह ओळख अधिक दृढ करत, प्रगतीचा हा उंच शिखर गाठला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना मा. अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी सांगितले की, “ही यशस्वी वाटचाल केवळ आकड्यांची नाही, तर हजारो ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांनी बँकेवर दाखवलेल्या अढळ विश्वासाची ही साक्ष आहे.” त्यांनी पुढे सर्व ग्राहकवर्ग, सभासद, कर्मचारीवर्ग आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार मानत अभिनंदन केले.


बँकेच्या प्रगतीमागे कर्मचाऱ्यांची निष्ठा, संचालक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि ग्राहकांशी जपलेले स्नेहपूर्ण नाते यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. येणाऱ्या काळातही अधिक सक्षम, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख सेवा देत जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेची ही यशोगाथा केवळ आर्थिक वाढ नव्हे, तर ग्रामीण भागातील विकासाच्या नव्या शक्यता उजळवणारी ठरत असून, भविष्यात आणखी उंच भरारी घेण्याची ही नांदी मानली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles