सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा थेट ऐकून त्यावर तत्काळ मार्ग काढण्याच्या उद्देशाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी जनतेच्या गाठीभेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
जनतेशी थेट संवाद साधण्याची परंपरा जपत, पालकमंत्री राणे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओरोस येथील जिल्हा मुख्यालयातील पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी तसेच विविध विकासकामांबाबतच्या सूचना थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांची ही भेट म्हणजे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट करणारी ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या प्रश्नांना थेट वाचा फोडण्याची आणि त्यावर त्वरित निर्णय प्रक्रियेला गती देण्याची ही प्रभावी संधी मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही गाठीभेट निश्चितच लोकाभिमुख प्रशासनाचा उत्तम नमुना ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.



