दोडामार्गला एसटीचा ‘भंगार’ धक्का!, जुन्या जीर्ण बसेस देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ; बाबुराव धुरींचा संतप्त इशारा, ‘नवीन बसेस द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू!’

दोडामार्ग : महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा सीमेवरील दुर्गम आणि डोंगराळ दोडामार्ग तालुक्याच्या एसटी सेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, जुन्या जीर्ण बसेसच्या माध्यमातून प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. नवीन आणि सुस्थितीतील बसेस इतर आगारांच्या वाट्याला, तर मोडकळीस आलेल्या बसेस दोडामार्गच्या ग्रामीण मार्गावर पाठविण्याचा प्रकार किती दिवस सहन करायचा, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

आज सकाळी झरेबांबर–सावंतवाडी (MH 20 BL 2139) ही जुनी जीर्ण बस मोरगाव येथेच बंद पडल्याने एसटी महामंडळाच्या कारभाराचा पुन्हा एकदा पंचनामा झाला. विशेष म्हणजे, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस वाटेतच बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची संतापजनक घटना घडली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या अशा प्रसंगी एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा कितपत योग्य, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नवीन गाड्या दुसरीकडे; ‘भंगार’ दोडामार्गच्या माथी?

दोडामार्ग हा दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती तालुका असतानाही येथील ग्रामीण वाहतुकीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. सावंतवाडी आणि कणकवली आगारात तुलनेने नवीन व चांगल्या स्थितीतील बसेस ठेवायच्या आणि भंगारात काढण्याच्या स्थितीतील जुन्या गाड्या दोडामार्गच्या ग्रामीण मार्गावर ढकलायच्या, हा दुजाभाव आणखी किती काळ सुरू राहणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

एसटीच्या या जुन्या गाड्यांमुळे रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस वेळेवर येत नाही आणि आलीच तर ती मध्येच बंद पडण्याची भीती कायम असते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि नोकरदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.

पावसाळ्यात धोका आणखी गंभीर!

पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. जुन्या बसेसची ब्रेक व्यवस्था, वायपर, टायर आणि इतर यांत्रिक बाबी सुरक्षित आहेत का, याची नियमित तपासणी केली जाते का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मुसळधार पाऊस, निसरडे रस्ते आणि डोंगराळ मार्ग यामुळे अपघाताचा धोका असताना अशा बसेस रस्त्यावर धावणे म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड असल्याचा आरोप होत आहे.

‘आता थट्टा नको; नवीन बसेस द्या!’ – बाबुराव धुरी.

“दोडामार्ग तालुक्यावर आजपासून नव्हे, तर कायमच अन्याय होत आला आहे. आम्हाला नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. नवीन बसेस देण्याऐवजी जुन्या जीर्ण गाड्या देऊन दोडामार्गच्या जनतेची थट्टा केली जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून सुस्थितीतील नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा प्रवाशांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,” असा संतप्त इशारा बाबुराव दत्ताराम धुरी यांनी दिला आहे.

एसटी महामंडळाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन दोडामार्ग तालुक्यातील बससेवेचे वास्तव तपासावे, जुन्या धोकादायक बसेस तात्काळ हटवाव्यात आणि नवीन व सुरक्षित बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रवाशांच्या जीवापेक्षा ‘जुन्या गाड्यांचा हिशेब’ मोठा की काय? असा संतप्त सवाल आता दोडामार्गच्या जनतेसमोर उभा ठाकला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles