‘तक्रारी’वर तत्परतेची ‘करंट’., माडखोलकरांचा महावितरण अभियंता शैलेश राक्षे यांना कृतज्ञतेचा सलाम! ; गणेशोत्सवापूर्वी अवघ्या दोन दिवसांत ट्रान्सफॉर्मर बदलले अन् वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थांकडून गौरव!

✍️ लखन आडेलकर.

माडखोल (प्रतिनिधी) –  एखाद्या गावाची समस्या प्रशासनाच्या दारात पोहोचते आणि त्यावर तत्परतेने कार्यवाही होताच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाची लखलख उमटते. माडखोल गावातील वीजपुरवठ्याची समस्या अशीच तत्परतेने मार्गी लावत ग्रामस्थांचा विश्वास जिंकणारे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांचा माडखोल ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील विद्युत भार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बंद असलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून वीजपुरवठा अधिक क्षमतेने आणि सुरळीत करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी श्री. राक्षे यांचे आभार मानले.

मागणी ३१ ऑगस्टला; कार्यवाही अवघ्या दोन दिवसांत!

माडखोल ग्रामस्थांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयात जाऊन शैलेश राक्षे यांची भेट घेतली होती. यावेळी सापळेस्टॉप येथील बंद असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच बामणादेवी येथील बंद ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या काळात गावातील वीजवापर वाढणार असल्याने संभाव्य समस्या लक्षात घेऊन श्री. राक्षे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत अवघ्या दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही केली. परिणामी गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होऊन गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.

तत्पर कार्यवाहीला ग्रामस्थांची कृतज्ञतेची पावती

समस्या मांडल्यानंतर तिचे गांभीर्य ओळखून तातडीने कार्यवाही करणाऱ्या श्री. राक्षे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ७ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

माजी सरपंच राजन विष्णू राऊळ यांच्या हस्ते शैलेश राक्षे यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. उपसरपंच श्री. दत्ताराम कोळमेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सरपंच श्री. राजन राऊळ, उपसरपंच श्री. दत्ताराम कोळमेकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुका प्रमुख श्री. वासुदेव होडावडेकर, माजी उपसरपंच श्री. सुरेश आडेलकर, सोसायटी संचालक श्री. प्रकाश नाईक, श्री. लखन आडेलकर, श्री. जीवन केसरकर, श्री. निलेश लातये, श्री. प्रभाकर गावडे, श्री. भरत राऊळ, श्री. भास्कर परब यांच्यासह माडखोल ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून ‘तक्रार’ फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या श्री. राक्षे यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक केले. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयातून समस्या कशा झटपट सुटू शकतात, याचे माडखोल येथील हे उदाहरण ठरले आहे.

‘वीज’ फक्त दिवे उजळत नाही, तर विकासाची वाटही उजळते; आणि त्या वाटेवरील अडथळे तत्परतेने दूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची पावती म्हणजे माडखोल ग्रामस्थांचा हा कृतज्ञतेचा सत्कार!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles