कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील एसटी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांच्या गैरसोयीला वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आक्रमक झाले आहेत. चाकरमानी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ लक्षात घेता सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग अशी एसटी बससेवा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी ते एसटी विभागाच्या नियंत्रक दीपक घोडे यांची भेट घेणार आहेत.

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या मातीत परतणाऱ्या चाकरमान्यांचा भावनिक सोहळा. मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून रेल्वेने सावंतवाडीपर्यंत पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी दोडामार्गकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतुकीच्या साधनांचा मोठा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग थेट एसटी सेवा सुरू झाल्यास चाकरमान्यांसह स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेसची संख्या वाढविणे, जीर्ण बसेसचा प्रश्न, रखडलेल्या अथवा अपुऱ्या बसफेऱ्या आणि अन्य प्रलंबित वाहतूक समस्या यावरही या भेटीत चर्चा होणार आहे. गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने तत्पर नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या एसटी सेवेचा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून तो चाकरमानी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा प्रश्न आहे. त्यामुळे या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा धुरी यांनी व्यक्त केली आहे.
“प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सकारात्मक निर्णय होईल,” अशी अपेक्षा व्यक्त करत बाबुराव धुरी यांनी एसटी प्रशासनाकडे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर दोडामार्गच्या एसटी प्रश्नाला गणेशोत्सवापूर्वी हिरवा कंदील मिळणार का? याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.



