सावंतवाडी पुन्हा हादरले! – बांधकामस्थळी दुर्दैवी अपघातात २० वर्षीय युवतीचा मृत्यू.

सावंतवाडी :  येथील बिरोडकर टेंब येथील द्वारका नगरी परिसरात सुरू असलेल्या सात मजली इमारतीच्या बांधकामस्थळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका २० वर्षीय कामगार युवतीचा मृत्यू झाला. रुबी खातून मुन्ना खान (वय २०, मूळ रा. पूर्व चंपारण, बिहार; सध्या रा. द्वारका नगरी) असे मयत युवतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत. दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास रुबी खातून यांच्या खोलीतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे त्यांचे पती आशू साबीर हुसेन आणि शेजारी हसन सय्यद यांच्या सोबत त्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेला ट्यूबलाईट काढून खाली आणण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी हसन सय्यद ट्यूबलाईटची वायर काढत असताना आशू हुसेन मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने उजेड देत होते. दरम्यान, रुबी खातून मोबाईलकडे लक्ष देत बाजूला सरकल्या असता अंधारात चौथ्या मजल्यावरील मोकळ्या ‘डक्ट’मधून खाली पडल्या. गंभीर जखमी झालेल्या रुबी यांना तात्काळ मोटारसायकलवरून उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन खात्री केली. यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत युवतीचे माहेरचे नातेवाईक बिहार येथून आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची अधिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पीएसआय माधुरी मुळीक तसेच हवालदार महेश जाधव, संजय कोरगावकर आणि प्रवीण वालावलकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles