कणकवलीत १० एप्रिलला खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सोहळा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती. ; सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट, अभिनेता संजय दत्त राहणार उपस्थित.

कणकवली :  माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी कणकवली येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी राणे हे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने पुढील एक वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्यासह राज्य व केंद्रातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांची उपस्थिती आणि कार्यक्रमानंतर होणारा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट. कोकणवासीयांसाठी हा सांस्कृतिक मेजवानीचा सोहळा ठरणार आहे.

अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष –
प्रभाकर सावंत म्हणाले, राणे यांच्या कार्यामुळे कोकणाला वेगळी ओळख मिळाली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त वर्षभर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दर महिन्याच्या १० तारखेला हे उपक्रम आयोजित केले जाणार असून सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

पुष्पगुच्छ नको, पुस्तके द्या’
वाढदिवसानिमित्त आयोजकांनी अनोखे आवाहन केले आहे. राणे यांना पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट द्यावीत, असे सांगण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी पुस्तके संकलनाची व्यवस्था करण्यात येणार असून ही पुस्तके ग्रामीण भागातील ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. वाचन संस्कृतीला चालना देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

विशेष आसन व्यवस्था –
राणे हे सर्वपक्षीय नेते असल्याने त्यांच्या वाढदिवसाला विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतात. त्यामुळे विशेष निमंत्रितांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस उपस्थिती – 
प्रहार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेस अतुल काळसेकर, प्रमोद कामत, मनीष दळवी, दत्ता सामंत, अमित नाईक, श्वेता कोरगावकर, हर्षदा वाळके, सोनू सावंत, मनोज रावराणे, अशोक सावंत, प्रकाश मोरे, मिलिंद मेस्त्री, समीर नलावडे, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles